बहुचर्चित ‘झिपऱ्या’चा टीझर प्रदर्शित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/ZIPARYA-.jpg)
- ५५ व्या राज्य पुरस्कारात तीन पुरस्कारांनी गौरव
ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले आहे.
मुंबईतील रेल्वे स्टेशन जवळ आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी मुले बघितली असतील. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले प्रचंड मेहनत करतात. अशाच युवकांची कथा ‘झिपऱ्या’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यातील समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना वाट्याला येणारी उपेक्षा यावर यातून भाष्य केल्याचे दिसते. तसेच ‘हम वो जुते है, जो जमी पे होते है, पर तारे छुते है’ या गाण्यातून या मुलांची धम्माल मस्तीही दिसत आहे. यामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारीत पटकथा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले असून यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय – अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत.
दरम्यान, ‘झिपऱ्या’ या चित्रपटाला ५५ व्या राज्य पुरस्कारात तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट संकलन देवेंद्र मुर्डेश्वर, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक विनायक काटकर आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रकाश निमकर यांचा समावेश आहे. ‘झिपऱ्या’ येत्या २२ जुन रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.