मुख्यमंत्री आमचाच होणार, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची बॅनरबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/new.jpg)
नाशिक – राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीचा निर्णय झाला आहे. मात्र, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल की भाजपाचा यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. नुकतेच नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे बॅनर्स लावून भाजपला खिजवले आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्रीपदावरून सेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामधून मुख्यमंत्रीपदावरून निरनिराळी वक्तव्ये करण्यात आली होती. त्यातच आता यामध्ये नाशिकच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार या आशयाचे बॅनर्स लावण्यात आली आहेत. ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजपा युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार’ असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या बॅनरमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण दराडे यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
सोमवारी भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले होते. आपण स्पष्टपणे सांगत असून महाराष्ट्रात सध्या भाजपाचाच मुख्यमंत्री आहे. तसेच पुन्हा भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. आम्ही महाराष्ट्रात युतीत निवडणूक लढवू. परंतु मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल, असे त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, यानंतर शिवसेनेत नाराजीचे वातावरण पसरल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे बॅनर पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले होते.