औरंगाबाद रेल्वे स्थानकावर ‘संभाजीनगर’ पाटी लावल्याने उफाळला वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Aurngabad.jpg)
औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर असलेले औरंगाबाद हे नाव खोडून तिथे संभाजीनगर अशी पाटी लावली गेल्याने रविवारी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात यावं अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यात हा प्रकार रविवारी घडल्याने शिवसेना आणि एमआयएम यांच्यातला वाद उफाळून आला. रेल्वे स्थानकावर असलेल्या फलाट क्रमांक २ च्या पाटीवर पिवळा रंग टाकून त्यावर संभाजीनगर अशी पाटी लिहिण्यात आली.
ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत असे सांगितले आहे. ज्यानंतर शिवसेना आणि एमआयएम यांच्यातला वाद समोर आला आहे. याप्रकरणी एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना सांगितली. या घटनेनंतर काही काळ औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेली संभाजीनगर ही पाटी हटवली. तसंच या प्रकरणी संबंधित कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अनधिकृतपणे नाव बदलल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचं नामकरण करण्यात यावं या मागणीसाठी औरंगाबादमध्ये अनेकदा वादही झाला आहे. हा मुद्दा निवडणुकांमध्येही गाजला. त्यामुळे आगामी काळात नामांतरच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे.