ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री संजय राठोड थेट ऊसाच्या फडात; विशेष नोंदणी मोहीम राबविणार
कोपरगावातील दोन साखर कारखान्यांना भेट; कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांचे आश्वासन

शिर्डी : राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोळपेवाडी येथील ‘कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना’ आणि संजीवनीनगर येथील ‘सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना’ येथे भेट देऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.
मंत्री राठोड यांनी प्रत्यक्ष ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोडणीच्या कामाचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगारांना शिधा किटचे वाटपही करण्यात आले. या वेळी आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, दोन्ही साखर कारखान्यांचे संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, शेतकरी आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांसाठी विशेष नोंदणी मोहीम
कामगारांशी संवाद साधताना अनेक ऊसतोड कामगारांची संबंधित महामंडळाकडे नोंदणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. नोंदणीअभावी पात्र कामगार शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर विशेष नोंदणी मोहीम राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार अत्यंत कष्टाचे काम करतात. रोजगारासाठी त्यांना राज्याबाहेरही जावे लागते. त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन शासनापर्यंत पोहोचवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा – विशेष लेख : ब्राह्मणवादी समाजात स्त्रीचा गौरव अन् निर्णयाचा अधिकार कुणाकडे?
मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आणि वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर राहील. पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास संबंधित योजनेच्या निकषांनुसार आर्थिक मदत देण्याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच ऊसतोडणीच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन मंत्री राठोड यांनी दिले.
ऊसतोड कामगारांनी यावेळी कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या सुरक्षाविषयक अडचणी मांडल्या. रात्री ऊसतोडणी करून सकाळी नऊ वाजेपर्यंत काम करावे लागते. त्यानंतर काही तासच विश्रांती मिळते. रात्री ऊसाच्या गाड्या भरणे आणि रिकाम्या करणे अशी कामेही करावी लागतात. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा किटचा वापर होत नाही. रात्रीच्या वेळी पुरेशी बॅटरी किंवा प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधारात काम करावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्या आणि सापांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा साहित्य आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी कामगारांनी केली.
कामगारांनी मांडलेल्या या समस्यांची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
कामगारांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडणार
राज्यातील सर्व साखर कारखाना प्रशासनाने कामगारांचे आरोग्य, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येतील. राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन कामगारांच्या समस्यांचे संकलन केले जात आहे. या समस्यांवर चर्चा करून कामगारांच्या हिताचे ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री राठोड यांनी दिले.
जलसंधारणाच्या कामांना गती देणार
पावसातील खंडामुळे शेतकरी आणि कामगारांसमोर निर्माण झालेल्या अडचणींबाबत बोलताना मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची भूमिका मांडली. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, नाला खोलीकरण, पाणी अडविणे आणि मुरविणे तसेच सिंचनाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या नोंदणीपासून ते त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणच्या मूलभूत सुविधांपर्यंतचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.




