TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधान परिषद निकालानंतर महायुतीत वाद; निलेश राणेंचा नवनाथ बन यांना थेट इशारा!

निलेश राणेंची सोशल मीडियावरून टीका, तर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना वाद टाळण्याचे निर्देश

MLC Election Result 2026 :  राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनीही या वादात उडी घेतली आहे.

निलेश राणेंचा नवनाथ बन यांच्यावर निशाणा

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या तीनही जागा जिंकल्या, तर महायुतीने शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीच्या, तर दोन जागा महायुतीच्या खात्यात गेल्या.

पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने साथ न दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महायुतीच्या निवडणूक गणिताला फटका बसल्याचेही त्यांनी म्हटले होते. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नवनाथ बन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती, तू बोलतो किती,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. राणे यांच्या या पोस्टनंतर नवनाथ बन यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –  शेतकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले; एकनाथ शिंदे निलंबनाच्या तयारीत?

महायुतीतील वाद टाळण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेला विसंवाद वाढू नये, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करावे आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी, असे शिंदे यांनी सांगितल्याची माहिती आहे. युतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

महायुती म्हणून काम करताना झालेल्या चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. महायुती समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या सूचना

गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये, असे स्पष्ट निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीने एकजुटीने पुन्हा कामाला लागावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्यामुळे निलेश राणे यांच्या टीकेनंतर भाजपकडून काय भूमिका घेतली जाते आणि महायुतीतील हा वाद वरिष्ठ नेते कशा पद्धतीने मिटवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button