“महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची वाट पाहतोय”; राज ठाकरेंचे वक्तव्य

Raj Thackeray | मुंबईतील पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. वाहतूकदारांना शिस्त यावी याकरता कठोर कायद्यांची गरज असल्याचं त्यांनी कायम अधोरेखित केलं आहे. आज त्याच अनुषंगाने त्यानी महाराष्ट्र माझ्या हातात कधी येतोय,याची मी वाट पाहतोय, असं विधान केलं. नवी मुंबईत आयोजित केलेल्या वाहतूक सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मी आता काही वाहतूकदारांशी बोललो. माझा संबंध फक्त वाहतुकीशी येतो. मी माझ्या भाषणात अनेकदा शहरांचा, वाहतुकींचा विषय काढला आहे. आता त्यांनी ई चलानचा मुद्दा काढला. ई-चलानला विरोध नाही, परंतु ज्या प्रकारे लावले जातात, त्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. ई चलान कॅमेऱ्यावर यायला हवं. पण, व्यक्तीशः जातात आणि ई चलान फाडतात. आज हा वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जो मी अनेकदा भाषणात बोलून दाखवला आहे, तो पुढे आक्राळविक्राळ होणार आहे, आता झालेलाच आहे. परंतु, कोणत्याही गोष्टींची बंधनं, चौकट ही आपल्याकडे घातलेली नाही.
मला या देशातील ट्रॅफिक पाहिल्यावर देशाचं वर्तमान आणि भविष्यही दिसतं. याचं कारण आपल्याला माहितीच नाही की गाड्या चालवायच्या कशा आणि पार्क कशा करायच्या? हे सरकारलाही माहिती नाही. त्यामुळे आकार उकार नावाची गोष्टच राहिलेली नाही. आपल्याकडे पूल बांधले जातात. रस्ते अशासाठी बांधले जातात जेणेकरून दोन वर्षांनी कामं निघावीत. याबाबत गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
माणसांचं काम कमी व्हावं, म्हणून यंत्र आलीत. आपल्याकडे ट्राफिक सिग्नल आले, जेणेकरून माणसांचं काम होईल. पण आपल्याकडे ट्राफिक सिग्नलही असतो आणि पुढे हवालदारही असतो, इतकी आपल्याकडे खात्री असते, असं ते म्हणाले.
हेही वाचा
रावेतमध्ये ३.१८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
मुंबईत रात्री १ वाजला असेल आणि सिग्नल चालू असेल तर मुंबईत गाड्या थांबायच्या. आज दुपारी एक वाजताही थांबत नाहीत. तुमच्यापैकी असतील जे दुचाकी चालवतात. त्यांना असं वाटतं की सिग्नल आपल्यासाठी नाहीच. मी मध्यंतरी याच बाबतीतील प्रपोजल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितलं. पुढे काही झालं नाही. मी त्यांना सांगितलं होतं की जे नो पार्किंगचे फुटपाथ आहेत, तिथे काळ्या आणि लाल रंगाच्या पट्ट्याने रंगवा. जिथे पार्किंग करायचे आहे, तिथे पिवळ्या आणि काळ्या रंगांनी रंगवा. मी दोन चार वेळा सांगितल्यानंतर दादरमधील एका फुटपाथचे रंग लाल करून टाकले. पण लोकांना कोण सांगणार?, असंही राज ठाकरे म्हणाले.
जिथे आपण गाड्या चालवत आहोत, साधारणपणे एखाद्या क्षेत्रफळाच्या १५ टक्के रस्ते असले पाहिजे, असा कायदा आहे. जिथं ५० माणसं राहत होती, तिथे ५०० माणसं आली, त्यांच्या गाड्या आल्या. पण त्या पार्क कुठे करणार? आपल्याकडे डेव्हलोपमेंट होते, पण टाऊन प्लानिंग होत नाही. त्यामुळे सर्व बोजवारा उडतो. याचं पुढे काय होणार आहे, याची काहीही कल्पना नसते. नागरिक म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली तर, गोष्टी आपोआप होतील. माझ्याकडे पोलिसांच्या गाड्या असतात. पुढे पायलट गाडी असते. त्यांना मी दरवेळेला सांगतो, आवाज करू नका, मला असं वाटतं की पकडून नेत आहेत. गरज नसेल तर कशासाठी हा त्रास. सांगायचा मुद्दा असा की पोलीस संरक्षण असूनदेखील माझ्या सर्व चालकांना ताकिद असते की सिग्नल मोडायचा नाही. कितीही महत्त्वाचं काम असलं तरीही सिग्नल मोडायचा नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मी पुन्हा या सर्व गोष्टी सरकारला सांगणार आहे. मला कधी कधी वाटतं की पुण्यासारख्या शहरात एक दिवस सगळे उठतील, गाड्या घेतील आणि तिथेच बसतील. गाडी पुढेच जाणार नाही. बदाबदा गाड्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खराब करायची, आज नवी मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करत आहेत, रेल्वे कोलमडली आणि गाड्यांमध्ये आले तर कुठून बाहेर पडाल घरातून? शहरांना काही आकारच उरला नाहीय. फुटपाथवर चालता येत नाही. मैदाने नाहीत, बागा नाहीत. कुठेही टॉवर, कॉलन्या उभ्या राहत आहेत. तिकडे टँकरने पाणी जातंय, याला शिस्त म्हणतात का? असे ते म्हणाले.
तज्ज्ञ मंडळींना विचारात घ्यायचं असतं. बिल्डारांच्या दोस्तीतून प्लान आखतात, पण टाऊन प्लानिंग नावाची गोष्ट होत नाही. मी खरंच वाट पाहतोय की हा महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय. अशा प्रकारच्या गोष्टींना शिस्त आणणं हे काही रॉकेट सायन्स नाही. याला फक्त इच्छा लागते, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सत्ता हातात देण्याबाबत आवाहन केलं आहे.




