सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा तडाखा! वादळी वाऱ्यामुळे भातशेती जमीनदोस्त; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडीत मुसळधार पाऊस; २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता

Sindhudurg Rain News : राज्यात दुष्काळी परिस्थितीची चिंता असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका भातशेतीला बसला असून, उभी पिके आडवी झाली आहेत. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली भातशेती भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रातील हवामान बदलाचा परिणाम?
मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे काढणीच्या टप्प्यात असलेल्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आधीच शेतीसमोरील विविध अडचणींमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा अतिरिक्त फटका बसला आहे.
हेही वाचा – रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! ९ दिवसांत ₹६२८ कोटींची कमाई; सलमान-प्रभासचे रेकॉर्ड मोडले
२७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामानातील बदलांमुळे २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, कोल्हापूर, घाटमाथा आणि सातारा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील काही दिवस पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोरडे हवामान राहू शकते. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेली भातशेती सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य असल्यास पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतीबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




