Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपुरातील न्यू एरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन; २,४०० आजारांचा योजनेत समावेश, अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे मेडिकल टुरिझमला चालना

नागपूर : सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी या योजनेत २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज न्यू एरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती, न्यू एरा हॉस्पिटलचे प्रमुख आनंद संचेती, उज्वल पगारिया, डॉ. निलेश अग्रवाल, हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंटच्या प्रियंका सावंत आणि विधिरा मिश्रा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

नागपूर मेडिकल हब म्हणून विकसित

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरची ओळख मेडिकल हब म्हणून निर्माण झाली आहे. राज्यासह देशात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. विविध देशांतील नागरिकही दर्जेदार आरोग्यसेवेसाठी भारताला प्राधान्य देत आहेत.

राज्यात अत्याधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देतानाच त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळणे आवश्यक आहे. यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासनाचा भर आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा आणि योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  राहुल नार्वेकर यांची कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर नियुक्ती

३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय

न्यू एरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी प्रास्ताविकातून रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. या रुग्णालयात ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली असून, एआय आधारित डिजिटल मॅमोग्राफी आणि तत्काळ एमआरआय करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांमुळे विशेषतः कर्करोगाच्या निदानासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी मदत होणार आहे.

रुग्णालयाच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भविष्यात रुग्णसेवेसाठी आणखी काही प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ. संचेती यांनी दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. निलेश अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button