बीडमध्ये दुष्काळी संकट गडद! सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; पीक पंचनामे, पाणीपुरवठा आणि चारा नियोजनाला वेग देण्याचे निर्देश
जिल्ह्यात २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा; टँकरवर GPS नियंत्रण, पीक विम्यात पारदर्शकता आणि जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य

बीड : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. शेतकऱ्यांचे पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा आणि ग्रामीण भागातील रोजगार या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीस आमदार प्रकाश सोळुंके, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके करपली असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल प्राप्त होताच नियमानुसार पुढील कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.
पीक विमा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखावी. पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा; GPS नियंत्रणाचे निर्देश
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, या टँकर्सच्या हालचालींवर GPS प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पिण्यायोग्य पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी करू नये. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. त्याचबरोबर जलस्रोतांचे पुनर्भरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी जलसंवर्धनाची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.
जनावरांच्या चाऱ्यासाठी पूर्वनियोजन
दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स आणि अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय, वीबी-जी रामजी योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे जलसंवर्धनाशी जोडून प्रभावीपणे राबवावीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतर टाळण्यास मदत होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
दुष्काळात काटकसरीचे आवाहन
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा. लग्न आणि वाढदिवसांसारख्या कार्यक्रमांवरील खर्च कमी करून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबून नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पाणी, चारा आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही बाबींवर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.




