देहूतील कचरा डेपोचा प्रश्न पेटला; बाहेरगावचा कचरा टाकून जाळणाऱ्याला भाजप युवा मोर्चाने पकडले
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि कंपाऊंडच्या मागण्या प्रलंबित; कायमस्वरूपी उपाय करा अन्यथा तीव्र आंदोलन : अनिरुद्ध काळोखे

देहूगाव | प्रतिनिधी : देहू येथील कचरा डेपोमध्ये बाहेरगावचा कचरा आणून रात्रीच्या अंधारात टाकण्यासह तो पेटवून दिला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कचरा टाकून जाळणाऱ्या एका इसमाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पकडून नगरपंचायत कर्मचारी आणि देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे यांनी दिला आहे.
देहू कचरा डेपोतील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात दुर्गंधी आणि धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. डेपोमध्ये बाहेरगावचा कचरा आणून टाकला जात असल्याचा तसेच रात्रीच्या वेळी तो पेटवून दिला जात असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे. कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

निवेदनानंतरही प्रशासनाची ठोस कार्यवाही नाही
या प्रश्नावर भाजप युवा मोर्चाच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. कचरा डेपो परिसरात दहा दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावा, संपूर्ण परिसराला संरक्षक कंपाऊंड घालावे आणि मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर कचरा टाकण्याची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या होत्या. मात्र, या मागण्यांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप युवा मोर्चाने केला आहे.
हेही वाचा – दिल्लीतील आंदोलनांवर भूषण गवईंचं मौन; संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांवर मांडली भूमिका

मध्यरात्रीची कारवाई; अग्निशामक दलाकडून आग विझवली
दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बाहेरगावची कचरा गाडी डेपोवर कचरा टाकत असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, कचरा टाकून तो पेटवला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत संबंधित इसमाला पकडले आणि देहू नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच देहूरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर संबंधित इसमाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. कचरा जळत असल्याने अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग विझविण्यात आली.
या कारवाईवेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, उपाध्यक्ष सचिन मराठे, दुर्गेश भालेराव तसेच देहू नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास आंदोलन अटळ
देहू कचरा डेपोतील अनियंत्रित कचरा टाकणे आणि जाळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी भाजप युवा मोर्चाची मागणी आहे. सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, संरक्षक कंपाऊंड आणि योग्य कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता देहू नगरपंचायत प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि कायमस्वरूपी उपाययोजना कधी राबवते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“देहूतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही. बाहेरगावचा कचरा टाकून तो जाळण्याच्या प्रकाराची प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, कंपाऊंड आणि शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. अन्यथा, भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— अनिरुद्ध काळोखे, अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, देहू




