Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मॅग्नेट २.० मधून शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठांची संधी; कृषी प्रक्रिया आणि निर्यातीला मिळणार चालना

२.३२ लाख शेतकऱ्यांना मॅग्नेट प्रकल्पाचा थेट लाभ; २३ कृषी मूल्यसाखळ्यांचा विकास आणि एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठा, कृषी प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचा दुसरा टप्पा अर्थात ‘मॅग्नेट २.०’ राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात कृषी मूल्यसाखळी मजबूत करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक मदत देणे आणि कृषिमालासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्पाची प्रशासकीय व वित्तीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आशियाई विकास बँकेकडील पुढील मंजुरीसाठी कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या मॅग्नेट प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली प्रगती आणि मॅग्नेट २.० च्या प्रस्तावित अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

२.३२ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक फलोत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. काढणीपश्चात पायाभूत सुविधांशी संबंधित ६२ उपप्रकल्पांना वित्तसाहाय्य करण्यात आले असून, १५३ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्यसाखळीतील घटकांना सवलतीच्या व्याजदराने आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच ६७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याशिवाय, २१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, तळेगाव येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २.३२ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ झाला आहे. लाभार्थ्यांमध्ये महिलांचा सहभाग ४८ टक्के असून, सुमारे ४ हजार ३०० रोजगार निर्माण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. प्रकल्पामुळे २७१ कोटी रुपयांची खासगी गुंतवणूकही झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  होर्मुजच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाज बुडाल्याचा इराणचा दावा; २,५०० कंटेनरला जलसमाधी

मॅग्नेट २.० मध्ये २३ कृषी मूल्यसाखळ्यांचा विकास

मॅग्नेट २.० अंतर्गत २३ कृषी मूल्यसाखळ्यांचा विकास करण्याचे नियोजन आहे. यामध्ये एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना क्षमता विकास प्रशिक्षण देणे, नव्या कृषी पायाभूत सुविधा उभारणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि कृषी प्रक्रिया व साठवणूक क्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.

कृषिमालाची गुणवत्ता टिकवून ठेवणे, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी अधिक प्रभावीपणे जोडणे, यासाठी प्रक्रिया सुविधा आणि निर्यात व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. या सुविधा वेळेत उभारून राज्यातील कृषी उत्पादनांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री रावल यांनी दिल्या.

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि डिजिटल व्यवस्था

राज्यातील कृषी पणन व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि डिजिटल प्रणालींचा वापर वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले. कृषिमालातील अवशेष तपासण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे तसेच ‘हब-अँड-स्पोक’ लॉजिस्टिक मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात आला.

जेएनपीटी, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधांशी कृषी मूल्यसाखळी जोडण्याचे नियोजन प्रभावीपणे राबवावे, असे मंत्री रावल यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या बाजार समित्यांचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास करून राज्यात आदर्श बाजार समित्या तयार करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळा

शेतकरी उत्पादक संस्था आणि कृषी मूल्यसाखळीतील गुंतवणूकदारांपर्यंत काढणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेने संयुक्तपणे कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचना मंत्री रावल यांनी केली.

या बैठकीला आशियाई विकास बँकेचे संचालक ताकेशी उएडा दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, आशियाई विकास बँकेचे कृषी व नैसर्गिक संसाधन विशेषज्ञ क्रिशन सिंग रौतेला, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group