उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांच्या उद्योजकीय वाटचालीची राष्ट्रीय स्तरावर दखल!
‘स्टार्टअपनेक्स्ट’च्या ‘फोर्टी ओव्हर फोर्टी’मध्ये समावेश

जलव्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासातील योगदान अधोरेखित
पुणे । विशेष प्रतिनिधी
जल व सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सुमारे दोन दशकांचा अनुभव असलेले डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे संस्थापक व संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या उद्योजकीय वाटचालीची ‘स्टार्टअपनेक्स्ट’च्या ‘फोर्टी ओव्हर फोर्टी’ या विशेष लेखातून दखल घेण्यात आली आहे. वयाच्या चाळिशीनंतर व्यवसायवृद्धी आणि नवकल्पनांना चालना देणाऱ्या ४० नेतृत्वकर्त्यांचा परिचय या लेखात करून देण्यात आला असून, त्यामध्ये कुलकर्णी यांच्या कार्याचा समावेश आहे.
उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांच्या कार्याची ‘हिंदुस्थान टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष लेखातून दखल घेण्यात आली आहे. ‘StartupNxt features 40 leaders driving growth and innovation after 40’ या शीर्षकाच्या लेखात डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे संस्थापक व संचालक कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या सुमारे दोन दशकांच्या अनुभवासह व्यवसायवृद्धी, नवकल्पना आणि शाश्वत विकासासाठीच्या योगदानाचा लेखात आढावा घेण्यात आला आहे.
‘हिंदुस्थान टाईम्स’वरील एचटी ब्रँड स्टुडिओच्या १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखात वयाच्या चाळिशीनंतर अनुभवाच्या बळावर व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आणि नव्या संधींचा उपयोग करणाऱ्या ४० नेतृत्वकर्त्यांचा परिचय देण्यात आला आहे. त्यातील ‘Water, Infrastructure & Sustainability’ या विभागात कुलकर्णी यांच्या उद्योजकीय वाटचालीला स्थान मिळाले आहे.
हेही वाचा
उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विशेष जलप्रक्रिया व्यवसायातून व्यापक अभियांत्रिकी सेवांकडे
लेखात नमूद केल्यानुसार, पुणेस्थित डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी जल आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. विशेष जलप्रक्रिया व्यवसायातून औद्योगिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांना अभियांत्रिकी व पायाभूत सुविधांशी संबंधित उपाय पुरवणारी कंपनी म्हणून तिचा विस्तार करण्यात कुलकर्णी यांनी योगदान दिले आहे. भारताच्या बदलत्या जलविषयक गरजांना प्रतिसाद देण्यासाठी उपाय विकसित करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा लेखात उल्लेख आहे. व्यावसायिक रणनीती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि संस्थात्मक वाढ यांचा समन्वय साधण्यावर त्यांचा भर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
नवकल्पना आणि जबाबदार विकासावर भर
कुलकर्णी यांच्या कार्याचा परिचय देताना नवकल्पना, जबाबदार पायाभूत सुविधा विकास आणि शाश्वत वाढीसाठी तंत्रज्ञानाधारित उपाय यांना लेखात महत्त्व देण्यात आले आहे. त्यांच्या व्यवस्थापनविषयक दृष्टिकोनातून व्यावसायिक आणि उद्योजकांना प्रेरणा मिळत असल्याची नोंदही करण्यात आली आहे. जलव्यवस्थापन आणि पर्यावरणाशी निगडित पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्याच्या उद्योजकाची वाटचाल या विशेष लेखाच्या माध्यमातून राष्ट्रीय वाचकांसमोर आली आहे.
“तब्बल २०५ कोटींहून अधिक उलाढालीचा व्यावसायिक प्रवास सांभाळताना एक गोष्ट शिकलो. खरी प्रगती पद, गाडी किंवा श्रीमंतीत मोजता येत नाही; ती माणसांशी जपलेल्या नात्यांत दिसते. ज्येष्ठांच्या अनुभवातून शिकत, नवे तंत्रज्ञान स्वीकारत पुढे जातानाही साधेपणा आणि आपलेपणा टिकला पाहिजे. शेवटी, प्रवास कोणत्या गाडीतून केला यापेक्षा तो कोणासोबत केला, हेच अधिक महत्त्वाचे असते.”
– प्रसाद कुलकर्णी, संस्थापक व संचालक, WTE Infra Projects Pvt. Ltd.




