MPSC आंदोलनातील १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल; रोहित पवार संतापले, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करू’
विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमावप्रकरणी गुन्हा; MPSC शुद्धीकरणासाठी आज गंगाआरती करणार, रोहित पवारांची घोषणा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमिततांविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस. एम. जोशी मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनाप्रकरणी मुख्य आयोजक प्रमोद पाटील, अक्षय कांबळे यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबर रोजी बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
‘विद्यार्थ्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करू’
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही वकिलांची फौज उभी करू. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे जामीनपात्र आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. पोलिसांवर दबाव असल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी नक्षलवादी आहेत का? न्यायालयाचा आदेश विद्यार्थ्यांच्या बाजूने येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – दिल्लीतील CJP आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली; १० ऑक्टोबरला मेट्रो स्थानके बंद, अनेक रेल्वेगाड्या रद्द
MPSC शुद्धीकरणासाठी गंगाआरती
MPSC आयोगाच्या कारभारात सुधारणा व्हावी, या मागणीसाठी आज सायंकाळी गंगाआरती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. पुणे महापालिकेने नदी किती स्वच्छ केली आहे, हेही यानिमित्ताने समोर येईल, असे ते म्हणाले. कोणतीही नदी असली तरी ती आपल्यासाठी पवित्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील आंदोलनासाठी रेल्वेगाड्या बंद केल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी दिल्लीला जाण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना पुण्यातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आंदोलनाचा नववा दिवस; उपोषणकर्त्यांबाबतही अपडेट
दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. आंदोलनस्थळी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या सात जणांपैकी तीन जणांनी उपोषण सोडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीही आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची गर्दी होती. काही आंदोलक रस्त्यावरच झोपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलनावरील पोलिसांची कारवाई आणि आयोगाच्या कारभाराबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे आता विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.




