चिंचवड येथील प्रातिभा महाविद्यालयाच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी
बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, जलतरण, नेमबाजी आणि जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश

चिंचवड | चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी संचलित प्रातिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय व दमदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत प्रातिभा महाविद्यालयाच्या महिला बॅडमिंटन संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघातील एस.वाय.बी.ए. ची हुशार खेळाडू कु. अर्पिता आर्डे हिची उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवून दिली. एफ.वाय.बी.कॉम चा विद्यार्थी हर्षद चौधरी याने ९५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले, तर वेदांत धोरे याने ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंची पुणे जिल्हा संघातून आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जलतरण स्पर्धेत एस.वाय.सी.एस. चा विद्यार्थी प्रथमेष कदम याने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक जिंकले.
हेही वाचा
दहा मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अचूक लक्ष्यवेध करत यश मिळवले. एस.वाय.बी.ए. ची कु. भक्ती नारायणकर हिने प्रथम क्रमांक, तर बी.कॉम (बी.एम.) ची कु. राजनंदिनी यादव हिने तृतीय क्रमांक पटकावला. या दोन्ही नेमबाजांची पुणे जिल्हा संघातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कलात्मक जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात एफ.वाय.बी.कॉम चा सार्थक विजय नलावडे याची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत सोहन गोळे, अथर्व शिंदे, केतन मोरे, शिवप्रसाद संगमे आणि स्नेहल गुप्ता या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजीनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ . तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, क्रीडा संचालक प्रा. संकेत सावेकर आणि प्रा. पांडुरंग इंगळे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील आंतरविभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला निश्चितच बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरले आहे. असे संस्थाचालक डॉ. दीपक शहा यांनी सांगितले.




