मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणींत मोठी वाढ! मतदार यादी पुनरीक्षणावरून विरोधक आक्रमक

Gyanesh Kumar | मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून देशभरात सुरू असलेल्या राजकीय गदारोळातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणींत आणखी मोठी भर पडली आहे. निवडणूक आयोगातील अन्य दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान केरळ सरकारने २००६ मधील एका वादग्रस्त आत्महत्या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (VACB) सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी २००६ मधील मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन (Lee See Been) यांच्या आत्महत्या प्रकरणाची पुनर्चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ली सी बीन हे केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत एमसी रोडच्या कामात सहभागी असलेल्या PATI-BEL कंपनीचे प्रतिनिधी होते. त्यांनी केलेल्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तत्कालीन राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सचिव ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे ही चौकशी तेव्हा अर्धवट राहिल्याचा ठपका ठेवत गृहमंत्र्यांनी सर्व जुन्या फाइल्स मागवून निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा
लाडक्या बहिणींच्या सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा; २५ ऑक्टोबरनंतर ₹१,५०० जमा होण्याची शक्यता
पी. चिदंबरम यांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मोठे आवाहन
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ‘SIR’ प्रक्रियेवरून देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) पुढे येऊन सत्य मांडण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बोलले आहेत, कर्नाटकाचे अधिकारी बोलले आहेत, तर ओडिशाच्या अधिकाऱ्याने मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे. न्यायालये समन्स बजावण्यापूर्वी इतर राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या सूचनांबाबत भूमिका स्पष्ट करावी,” असे चिदंबरम यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.





