Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा’; AIचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे राज्यपालांचे आवाहन

शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी सर्वसमावेशक करण्यावर भर; विद्यापीठांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याची जिष्णु देव वर्मा यांची सूचना

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स यांसारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा विकास हा केवळ तांत्रिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता त्याला मानवी चेहरा असावा आणि तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन, मुंबई येथे कुलगुरूंच्या ‘भविष्यवेधी तंत्रज्ञान गट’ (Futuristic Technology Forum) ची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला भविष्यवेधी तंत्रज्ञान गटाचे प्रमुख शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. अरविंद किवळेकर तसेच अन्य अध्यापक उपस्थित होते.

‘विकसित भारत’साठी विद्यापीठांमध्ये सहकार्य

‘विकसित भारत’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भविष्यवेधी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान राज्यातील सर्व विद्यापीठांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठांमध्ये परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भविष्यवेधी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी अधिक सर्वसमावेशक करण्यावर भर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  शाळा, आश्रमशाळा आणि आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान; फडणवीस यांचे निर्देश

आरोग्य क्षेत्रात AIचा उपयोग

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात AI तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक संवादी आणि प्रभावी होण्यास मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले. देशातील डॉक्टरांची लोकसंख्येच्या तुलनेत असलेली कमतरता लक्षात घेता आरोग्य क्षेत्रात AIच्या माध्यमातून अचूक रोगनिदानास मदत होऊ शकते. याचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

AIच्या मदतीने विस्मृतीसारख्या आजारांची पूर्वसूचना मिळविण्यास तसेच औषध संशोधनाला चालना देण्यासही मदत होऊ शकते, असे राज्यपालांनी सांगितले.

लॉजिस्टिक्समध्येही AIचा वापर

लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार होत असताना या क्षेत्रातही AIचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवर विविध टप्प्यांवर लक्ष ठेवणे आणि माल गंतव्यस्थळी पोहोचण्याचा अपेक्षित वेळ निश्चित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.

भविष्यवेधी तंत्रज्ञान गटाचे प्रमुख डॉ. राजनीश कामत यांनी गटाच्या शिफारसींच्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठांना २०३० पर्यंत विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘आरोग्य आणि लॉजिस्टिक्समधील AI’वर सादरीकरण

बैठकीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी ‘आरोग्य क्षेत्रात AI’, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. अरविंद किवळेकर यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील AI या विषयावर सादरीकरण केले.

राज्यपालांच्या हस्ते ‘Joy of Python’ पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डेटा सायन्सवरील ‘Joy of Python: Foundations of Data Science’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. जॉन रोज यांनी टोकियो येथील सोफिया विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने हे पुस्तक लिहिले आहे.

पुस्तकाचे सहलेखक जॉन मुकुलु आणि टॅड गोन्साल्विस यावेळी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button