TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘जातीच्या नावावर तिकीट घेतल्याने समाजाचा विकास होत नाही’; नितीन गडकरींचा राजकारणावर निशाणा

चर्मकार समाजाच्या मेळाव्यात गडकरींचं स्पष्ट वक्तव्य; ‘समाजात चांगलं नेतृत्व निर्माण करण्याची गरज’

नागपूर : निवडणुकीतील जातीय समीकरणांच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. केवळ एखाद्या समाजातील व्यक्तीला त्या समाजाच्या नावावर राजकीय तिकीट मिळाल्याने त्या समाजाचा विकास होत नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्य आणि चांगले नेतृत्व निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात आयोजित चर्मकार समाजाच्या मेळाव्यात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षण आणि कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

“अनेक जण म्हणतात, मी या जातीचा आहे, मला तिकीट द्या. मात्र तिकीट मिळाल्यानंतर तो समाजासाठी काहीच करत नसेल, तर केवळ समाजातील व्यक्तीला तिकीट मिळाल्याने समाजाचा विकास होतो असे नाही,” अशा आशयाचे वक्तव्य गडकरी यांनी केले.

‘समाजात चांगलं नेतृत्व निर्माण करा’

सरकारकडून समाजासाठी शक्य ते सहकार्य केले जाईल, मात्र समाजानेही चांगले नेतृत्व निर्माण करण्यावर भर द्यावा, असे गडकरी यांनी सांगितले. शिक्षणाचा संबंध कौशल्याशी असून कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

चर्मकार समाजातील पारंपरिक कौशल्यांना आधुनिक व्यवसायाशी जोडण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. विविध समाजघटकांमध्ये परस्पर सहकार्य आणि विकासाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाचाही उल्लेख केला. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  पुणे पदवीधर-शिक्षकच्या उमेदवारांबाबत दोन दिवसांत निर्णय; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

‘कोणताही व्यक्ती जन्माने मोठा होत नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी संत रविदास महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत सामाजिक प्रगतीवर भाष्य केले. नितीन गडकरी यांनी चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची परंपरा सुमारे १८ वर्षांपूर्वी सुरू केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांची कमाल पातळी सुमारे ८० ते ८२ टक्के होती, तर आता ती ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

“कोणताही व्यक्ती जन्माने मोठा होत नाही, तर ज्ञानाने मोठा होतो. त्यासाठी मन निर्मळ असायला पाहिजे,” असा संदेश संत रविदास महाराजांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले. जाती-पातीपेक्षा माणसाची उन्नती कशी होईल, हा विचार संत रविदास महाराजांनी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

संत रविदास महाराजांची जयंती सरकारकडून व्यापक स्वरूपात साजरी करून त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button