Asian Games 2026: सीमा कुमारीची ऐतिहासिक कामगिरी; महिलांच्या १०,००० मीटरमध्ये कांस्य, भारताचा १६ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला
३२ मिनिटे ५०.०५ सेकंदांत शर्यत पूर्ण; बहारीनच्या विनफ्रेड यावीला सुवर्ण, जपानच्या नोझोमी तनाकाला रौप्य

नागोया : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये भारताच्या ॲथलेटिक्स संघाला मोठे यश मिळाले आहे. भारताची लांब पल्ल्याची धावपटू सीमा कुमारी हिने महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले. या कामगिरीसह या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा तब्बल १६ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम शर्यतीत सीमाने ३२ मिनिटे ५०.०५ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. बहारीनच्या विनफ्रेड यावीने ३२:३९.१८ वेळेसह सुवर्णपदक, तर यजमान जपानच्या नोझोमी तनाकाने ३२:४१.५४ वेळेसह रौप्यपदक पटकावले.
सीमाने शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात संयमी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत तिसरे स्थान कायम राखले. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय ॲथलेटिक्सच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडली आहे.
हेही वाचा – ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी’; निवडणूक आयोगावरील आरोपांवर सुधांशू त्रिवेदींचं प्रत्युत्तर
कॅलिफोर्नियात नोंदवला वैयक्तिक सर्वोत्तम वेळ
१० जानेवारी २००१ रोजी जन्मलेली सीमा कुमारी हिमाचल प्रदेशची असून ५,००० आणि १०,००० मीटर धावण्याच्या प्रकारात तिने आपली ओळख निर्माण केली आहे. मार्च २०२६मध्ये कॅलिफोर्नियातील ‘द टेन’ स्पर्धेत तिने १०,००० मीटरमध्ये ३२:०२.४३ अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. एप्रिल २०२६मध्ये ५,००० मीटरमध्येही तिने १५:१६.२० अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदकांची कमाई
सीमाच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे. २०२५च्या FISU World University Gamesमध्ये तिने ५,००० मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. तसेच २०२४च्या Asian Cross Country Championshipsमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. २०२६च्या ६५व्या National Inter-State Senior Athletics Championshipsमध्ये १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकत तिने राष्ट्रीय स्तरावरील आपली कामगिरीही अधोरेखित केली.
आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकामुळे सीमाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एका महत्त्वाच्या यशाची भर पडली आहे.





