२०२९ पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्धार; अमित शाहांचा मोठा दावा
NDAच्या नेतृत्वाखालील २१ राज्यांमध्ये UCC लागू करण्याचे लक्ष्य; घुसखोरी, दहशतवाद आणि माओवादावरही शाहांचा कडक इशारा

मुंबई : देशात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील NDAची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचे लक्ष्य असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला असून, उर्वरित राज्यांमध्येही याबाबत पुढील काळात काम केले जाईल, असे शाह यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारने कलम ३७० हटविण्यासह देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’
सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या कारवायांमुळे दहशतवादाबाबत देशाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अधिक स्पष्ट झाले असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. देशात घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना देशाबाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
देशातील माओवादाचा पूर्ण खात्मा करण्यात यश आल्याचा दावा करत अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रात सरकारने महत्त्वाची कामगिरी केल्याचे शाह यांनी नमूद केले.
‘आणीबाणी लादून कारभार करणार नाही’
‘जेन झी’च्या नेतृत्वाखालील आंदोलनांच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांबाबत बोलताना शाह यांनी लोकशाहीत विविध मतांना स्थान असल्याचे सांगितले. भाजप सत्तेत असला तरी आणीबाणी लादून राज्यकारभार करण्याची पक्षाची संस्कृती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संवाद आणि चर्चेवर भाजपचा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – गरबा- दांडियावरून वाद; अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘सण सर्वसमावेशक असायला हवा’
भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढली
गेल्या १२ वर्षांत भारताची जागतिक प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढल्याचा दावा अमित शाह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतीय पासपोर्टचे महत्त्व वाढले असून, जगभरात भारताच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१४ पूर्वीचे राजकारण भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीने प्रभावित होते, तर २०१४ ते २०२६ या कालखंडात देश कामगिरीवर आधारित राजकारणाकडे वळला असल्याचा दावा त्यांनी केला. संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात ‘भारत प्रथम’ हे मार्गदर्शक तत्त्व असल्याचेही शाह यांनी सांगितले.
१७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’
भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहितीही अमित शाह यांनी दिली. सेवेला जीवनशैली बनवणे, लोकसहभाग वाढवणे आणि जनहिताच्या उपक्रमांना चालना देणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत बूथ, तहसील आणि जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, स्थानिक भाषांमधील संगीत आणि नाट्य सादरीकरणांच्या माध्यमातूनही अभियानाचा संदेश देशभर पोहोचविण्यात येणार आहे.




