Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विज्ञान संशोधन समाजोपयोगी ठरावे; जगाने स्वीकारावे असे तंत्रज्ञान विकसित करा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

हरित तंत्रज्ञान, शाश्वत अभियांत्रिकीवर भर; ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करण्याची रसायन तंत्रज्ञान संस्थेला सूचना

मुंबई : वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा किंवा शोधनिबंधांपुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) येथे आयोजित हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

वैज्ञानिकांनी व्यवहार्य, परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील अशी हरित तंत्रज्ञाने विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या उत्पादन आणि रसायन उद्योगांच्या पार्श्वभूमीवर आयसीटी आणि इंडियन केमिकल सोसायटीसारख्या संस्थांनी भारताला हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरण आणि शाश्वत रासायनिक अभियांत्रिकीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

भारताने केवळ इतर देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, जगाने स्वीकारावे असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही राज्यपालांनी नमूद केले.

‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करा

रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा, अशी सूचना राज्यपालांनी केली. या सप्ताहादरम्यान नागरिक, महाविद्यालये आणि शाळांसाठी संस्थेची दालने खुली करून संस्थेत सुरू असलेले संशोधन आणि नवोन्मेष सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.

अशा उपक्रमांमुळे विज्ञानावरील जनतेचा विश्वास वाढेल, तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि प्रयोगशाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

‘विज्ञानाचा अंतिम उद्देश जनसेवा हाच आहे,’ असे सांगत वैज्ञानिक कोणत्या क्षेत्रात संशोधन करीत आहेत, कोणत्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या संशोधनाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावांना दिलासा; २२ गावांतील नागरी सुविधांची कामे मार्गी लावण्याचे निर्देश

महिला वैज्ञानिकांना नेतृत्वाच्या संधी द्या

विज्ञान क्षेत्रातील महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरजही राज्यपालांनी अधोरेखित केली. परिषदेत १२ कर्तृत्ववान महिला वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महिला वैज्ञानिकांना संशोधनातील नेतृत्व, विद्यापीठ प्रशासन, उद्योजकता तसेच उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थांनी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

रसायन अभियांत्रिकी क्षेत्राची प्रदूषणकारी उद्योग म्हणून बदनामी झाली असली, तरी प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा देखील याच क्षेत्रातून निघणार आहे, असे संस्थेचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.

आयसीटीने घडविले १८ पद्म पुरस्कारविजेते वैज्ञानिक

रसायन तंत्रज्ञान संस्थेने देशाला १८ पद्म पुरस्कारविजेते वैज्ञानिक आणि सुमारे ७ हजार प्रथम पिढीतील उद्योजक दिले असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू आणि इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांनी सध्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संशोधक आणि पीएचडीधारक निर्माण करण्याची गरज असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. एम. एम. शर्मा यांनी सांगितले.

प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांचा गौरव

हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ महिला वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

परिषदेत महिला वैज्ञानिकांच्या योगदानाची विशेष दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मभूषण डॉ. टी. रामासामी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने वैज्ञानिक, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button