आर. के. एल. स्कूलमध्ये ‘गोपाळकाला’ उत्साहात; चिमुकल्यांच्या बालगोपाळांच्या रूपाने वेधले लक्ष श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा अनोखा संगम !

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी
येथील आर.के.एल. स्कूलच्या पूर्व-प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, चैतन्यमय आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. बालवयातच चिमुकल्यांच्या मनावर भारतीय संस्कृती व समृद्ध परंपरांचे संस्कार बिंबावेत, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक व मनोरंजक उपक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीकृष्ण आणि राधेच्या पारंपारिक वेशभूषेत नटलेले छोटे विद्यार्थी ठरले. त्यांच्या निरागस रूपाने आणि आकर्षक पेहरावाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित कथाकथन, सुश्राव्य भक्तीगीते आणि चिमुरड्यांचा बहारदार नृत्याविष्कार सादर करण्यात आला. उत्सवाचा खरा थरार ‘दहीहंडी’ उपक्रमात पाहायला मिळाला.
हेही वाचा
डॉ. सुशांत पाटील ग्रुपचा भव्य शिक्षक दिन सोहळा उत्साहात संपन्न
“गोविंदा रे गोपाळा”च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला, ज्यामुळे संपूर्ण शालेय परिसर कृष्णमय झाला होता.या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांच्या जीवनातून प्रेम, निखळ मैत्री, सहकार्य आणि सदाचार ही जीवनमूल्ये कशी आत्मसात करावीत, याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नेटके आयोजन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा उत्सव अत्यंत यशस्वी व स्मरणात राहणारा ठरला.
आर.के.एल. स्कूलमध्ये दरवर्षी जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या उपक्रमांचा मुख्य उद्देश मुलांमध्ये लहानपणापासूनच भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांची रूजवण करणे हा आहे. चिमुकल्यांचा यातील उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
– डॉ. पुष्कर चौबे, सीईओ, आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल.




