Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विशेष गरजा असलेल्या बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा; दत्तक प्रक्रियेसाठी समन्वित प्रयत्नांची गरज : मंत्री आदिती तटकरे

पुण्यात पश्चिम विभागीय प्रादेशिक सल्लामसलत कार्यशाळा; २०२५-२६ मध्ये विशेष गरजा असलेल्या ३९४ बालकांचे दत्तक विधान

मुंबई : विशेष गरजा असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. दत्तक प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी जनजागृती, सातत्यपूर्ण सहकार्य आणि प्रभावी समन्वय आवश्यक असून, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) वतीने विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या दत्तक प्रक्रियेला आणि कुटुंबाधारित संगोपनाला बळकटी देण्यासाठी पुण्यात पश्चिम विभागीय चौथी प्रादेशिक सल्लामसलत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.

‘दत्तक जागरूकता अभियान २०२५’ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि राज्य दत्तक संसाधन संस्था (SARA) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेण्यात आली. विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांचे संस्थाबाह्य पुनर्वसन आणि त्यांना सुरक्षित, प्रेमळ व पोषक कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील ७४ हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे १५० भागधारकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. दत्तक प्रक्रिया, बालकांचे पुनर्वसन, अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध संस्थांमधील समन्वय यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा –  बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन; हिऱ्यांच्या तपासणी प्रक्रियेची घेतली माहिती

CARAच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव भावना सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष गरजा असलेल्या ३९४ बालकांना दत्तक घेण्यात आले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हा आकडा ३१३ होता. त्यामुळे विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तक प्रक्रियेत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे.

राज्यातील दत्तक प्रक्रिया CARAच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे राबवली जाते. दत्तक इच्छुक पालकांची नोंदणी, आवश्यक पडताळणी, बालकाची जुळवणी आणि कायदेशीर दत्तक आदेश अशा विविध टप्प्यांनंतर बालकाला नवीन कुटुंब मिळते. या प्रक्रियेत बालकाच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य दिले जाते.

दरम्यान, नागपूर येथे ऑनलाइन दत्तक प्रक्रियेद्वारे सात बालकांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला. फ्रान्स, मुंबई, पुणे आणि वर्धा येथील दत्तक इच्छुक पालकांसाठी कायदेशीर दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे संस्थात्मक संगोपनाऐवजी बालकांना प्रेमळ कौटुंबिक वातावरण मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button