Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

CBIकडून FIR दाखल करून सखोल तपासाचे आदेश; पुरेसा पुरावा मिळेपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये, न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (२ सप्टेंबर) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दिशा सालियान यांच्या मृत्यूचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच CBIने FIR नोंदवून या प्रकरणाचा सर्वंकष तपास करावा आणि दिशा यांचे वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. मुंबई पोलिसांकडे असलेली या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने CBIकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीविरोधात पुरेसा ठोस पुरावा मिळेपर्यंत त्या व्यक्तीला आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

योग्य तपास होईल’, सतीश सालियान यांची प्रतिक्रिया

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचे दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी स्वागत केले आहे. आतापर्यंतच्या तपासाबाबत त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आता CBIमार्फत योग्य आणि सखोल तपास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, यापुढे आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे सतीश सालियान यांनी म्हटले. त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले.

CBIला तपासातून निष्कर्ष काढण्याचे निर्देश

न्यायालयाने CBIला प्रकरणातील सर्व बाबींचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासात गुन्हा झाल्याचे पुरेसे पुरावे आढळल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करावी. मात्र, तपासातून कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्यास संबंधित न्यायालयासमोर योग्य सारांश अहवाल दाखल करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा –  शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढणार

दिशा सालियान यांच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न

दिशा सालियान यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली होती. पोलिसांच्या तपासानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दिशा यांचे वडील सतीश सालियान यांनी तपासातील त्रुटींचा आरोप करत नव्याने आणि स्वतंत्र तपासाची मागणी केली होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवर आणि काही प्रक्रियात्मक बाबींवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर न्यायालयाने आता CBI तपासाचे आदेश दिल्याने या प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे.

आदित्य ठाकरेंचे नाव याचिकेतील आरोपांमध्ये

सतीश सालियान यांच्या याचिकेत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेत त्यांच्याबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. न्यायालयानेही पुरेसा पुरावा मिळेपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे CBIच्या पुढील तपासातून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button