महाराष्ट्रात दररोज २१ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू; पादचारी – वाहनचालकांसाठी परिवहनमंत्र्यांचा इशारा
२०२३ मध्ये राज्यात ३,११० पादचारी आणि ७,७८२ दुचाकीस्वारांचा मृत्यू; ‘रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी’

ठाणे : महाराष्ट्रातील रस्ते अपघातांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे २०२३ मधील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात २०२३ मध्ये ३,११० पादचारी आणि सुमारे ७,७८२ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सरासरी ८ ते ९ पादचारी आणि २१ दुचाकीस्वारांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
अपघाती मृत्यूंपैकी मोठा वाटा पादचारी आणि दुचाकीस्वारांचा
सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे, तर जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील परिस्थितीही चिंताजनक आहे. २०२३ मध्ये देशभरात ३५,२०३ पादचारी आणि ७७,५३९ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दररोज सरासरी ९६ पादचारी आणि २१२ दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याचे आकडेवारीतून दिसते.
हेही वाचा – कापूस-तुरीच्या शेतात गांजाची शेती; पोलिसांची मोठी कारवाई, 82.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’मधून वाहतूक नियमांचे धडे
वाहतूक नियमांचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवण्यासाठी ‘ट्रॅफिक स्कूल ऑन व्हील्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या फिरत्या वाहतूक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, वाहनचालक, व्यावसायिक चालक आणि नागरिकांना वाहतूक नियमांबाबत आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे.
हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन, मार्गिका शिस्त तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
‘मला काही होणार नाही’ हा आत्मविश्वास ठरू शकतो धोकादायक
रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा परिवहन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालक, पादचारी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मोबाइलवर बोलत किंवा संदेश पाठवत वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे या सवयी अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे विशेषतः तरुणांनी रस्ता सुरक्षेला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.





