रशिया-युक्रेन युद्धात भीषण हल्ला; वेअरहाऊसला लक्ष्य, ३७ जणांचा मृत्यू
मायला येथील दारुगोळा साठवलेल्या गोदामावर ड्रोन हल्ला; ४२ जण जखमी, ३८० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर

कीव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ उलटला असून, संघर्ष अद्यापही तीव्र आहे. युक्रेनच्या कीव प्रांतातील बुचा जिल्ह्यातील मायला शहरातील एका वेअरहाऊसवर रशियाने ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर वेअरहाऊसमध्ये मोठे स्फोट झाले असून, किमान ३७ जणांचा मृत्यू आणि ४२ जण जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
कीव प्रांताचे गव्हर्नर तिमुर तकाचेंको यांनी शनिवारी टेलिग्रामवर या घटनेची माहिती दिली. मृतांमध्ये दिमित्रिव्हस्काचे महापौर तारास डिडिच यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मायला शहरातील ज्या गोदामावर हल्ला झाला, तेथे दारुगोळा आणि स्फोटक सामग्री साठवण्यात आली होती. ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे परिसरात मोठी आग लागली.
५० हून अधिक निवासी इमारतींचे नुकसान
हल्ल्यामुळे बुचा जिल्ह्यातील सुमारे ५० निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. आग काही घरांसह एका रेस्टॉरंटपर्यंत पसरली. घटनेनंतर बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून, हल्लाग्रस्त परिसरातून ३८० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.
दारुगोळा साठवण्याची परवानगी होती का?
या घटनेप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. निवासी भागाजवळ स्फोटक वस्तू आणि दारुगोळा साठवण्याची परवानगी संबंधित कंपनीला होती का, तसेच आवश्यक परवाने आणि मंजुरी घेण्यात आली होती का, याची चौकशी केली जाणार आहे.
झेलेन्स्कींकडूनही हल्ल्याला दुजोरा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मायला येथील वेअरहाऊसवर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. निवासी भागांच्या जवळ दारुगोळा साठवता येत नाही, असे स्पष्ट करत या प्रकरणात फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हल्ल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





