नेवासा येथे भाजप नेते ऋषिकेश शेटेंवर जीवघेणा हल्ला; ७ जण ताब्यात, १०० जणांविरोधात गुन्हा
अतिक्रमण कारवाईच्या वादातून हिंसाचार; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे शेटे बचावले, परिसरात कडेकोट बंदोबस्त

अहिल्यानगर : जिल्ह्यातील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या मागणीवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यादरम्यान शेटे यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.
घटनेच्या वेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाचा प्रतिकार केल्याने ऋषिकेश शेटे या हल्ल्यातून बचावले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अतिक्रमण कारवाईदरम्यान गैरसमजातून वाद
नेवासा नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध केला. त्याचवेळी ऋषिकेश शेटे यांची गाडी कारवाई करणाऱ्या पथकाच्या मागून जात होती. त्यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि काही नागरिक आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या वादातून गणपती मंदिर परिसरातून जात असलेल्या शेटे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर जमावाने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
९० ते १०० जणांविरोधात गुन्हा; ७ जण ताब्यात
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ९० ते १०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
‘अफवांवर विश्वास ठेवू नका’
घटनेनंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
“कोणीही कायदा हातात घेऊ नये. काही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





