TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याला USCIRF चा विरोध; RSS सदस्यांवर निर्बंधांची मागणी

धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर USCIRF आक्रमक; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याला अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) विरोध केला आहे. मोहन भागवत या महिन्यात न्यूयॉर्कला भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर USCIRFच्या सदस्यांनी अमेरिकन सरकारने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या RSS सदस्यांवर निर्बंध घालण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे.

USCIRFच्या एका सदस्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीचा दाखला देत RSSशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

USCIRFचे प्रमुख असिफ महमूद यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे RSSशी संबंधित असल्याचा उल्लेख करत, या संघटनेशी संबंधित अनेक संघटनांवर अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचे आरोप असल्याचे म्हटले. या हल्ल्यांमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला.

हेही वाचा –  डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

USCIRFच्या आणखी एका सदस्य जेन मिल्स यांनीही मोहन भागवत यांना उच्चस्तरीय बैठका किंवा राजनैतिक सन्मान देऊ नये, अशी भूमिका मांडली. तसेच अमेरिकन सरकारने RSSच्या सदस्यांवर निर्बंध घालण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

USCIRF ही अमेरिकन काँग्रेसने १९९८ मध्ये स्थापन केलेली स्वतंत्र आयोगीय संस्था आहे. आयोगातील सदस्यांची नियुक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्वाकडून केली जाते. धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीचे मूल्यांकन करून अमेरिकन सरकारला त्यासंदर्भात धोरणात्मक शिफारशी करण्याचे काम या आयोगाकडून केले जाते.

यापूर्वीही USCIRFने RSS आणि इतर संबंधित संस्थांवर निर्बंध घालण्याची मागणी केली होती. धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्याला सुरक्षा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार धोरणाशी जोडण्याची भूमिकाही आयोगाने मांडली आहे.

USCIRFच्या ताज्या मागणीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यापूर्वी USCIRFच्या वार्षिक अहवालावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

भारताने USCIRFच्या अध्यक्षांकडून काही घटनांचा चुकीचा अर्थ लावून भारताच्या बहुविध आणि विविधतेने नटलेल्या समाजाबाबत प्रतिमा मलिन करणारी वक्तव्ये केली जात असल्याचे म्हटले होते. धार्मिक स्वातंत्र्याबाबतची खरी चिंता नसून हा एक जाणीवपूर्वक राबविला जाणारा अजेंडा असल्याची टीकाही भारताने केली होती.

मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर USCIRFच्या भूमिकेमुळे भारत-अमेरिका संबंध आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button