ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे महत्त्व

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिले अग्निशमन वाहने, उपकरणे व बचाव साहित्याचे प्रात्यक्षिक

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष अग्निसुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रायका स्कूल, पिंपळे सौदागर येथील विद्यार्थ्यांसाठी पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथे अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या अभियाना अंतर्गत लीडिंग फायरमन नामदेव वाघे यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीची तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन व बचाव पथकांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच आपदा मित्र संतोष शेलार, अफसाना पठाण, गीतेश बांगरे यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन वाहनांची पाहणी करून त्यामध्ये असलेली विविध उपकरणे, अग्निशमन साहित्य आणि बचाव साधनांची माहिती व प्रात्यक्षिक दिले.

यावेळी आग लागल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, सुरक्षित ठिकाणी जाणे, धुरापासून स्वतःचा बचाव करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आग लागल्यास तात्काळ अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हेही वाचा

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

विद्यार्थ्यांनी अग्निशमन केंद्राची पाहणी करत जवानांशी संवाद साधला आणि अग्निशमन वाहने, उपकरणे व बचाव साहित्याविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष पाहणी आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे कार्य जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.

लहान वयातच अग्निसुरक्षेबाबत योग्य माहिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची जाणीव निर्माण झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी अधिक सजगपणे व जबाबदारीने वागू शकतात. या उद्देशाने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शाळांमध्ये अग्निसुरक्षा जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अग्निसुरक्षेचे महत्त्व जाणून घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button