अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी मंगल कार्यालय संचालकासह तिघांवर गुन्हा

आळंदी | अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आळंदीतील अलंकापुरी मंगल कार्यालयाच्या संचालकासह तिघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी आळंदी, ता. खेड येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात घडली.
याप्रकरणी बिभिषण मधुकर जगदाळे (वय ४६, रा. जगदाळेवस्ती, भरतगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १८ वर्षांच्या मुलीचा विवाह सिध्दार्थ सोमनाथ साठे (रा. भवरापूर, ता. हवेली) याच्यासोबत लावण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित मुलाचे वय २० वर्षे ९ महिने असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हेही वाचा
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करा!
या प्रकरणात अलंकापुरी मंगल कार्यालय, आळंदी येथील संचालक, तसेच निखील संभाजी साठे आणि गणेश धनंजय साठे यांच्यासह अन्य चार ते पाच नातेवाईकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता विवाह सोहळा पार पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम १० व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.१० वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





