मलेशियात ‘आरकेएल गॅलेक्सी’च्या विद्यार्थ्यांची सुवर्णमय कामगिरी!
वेदार्थ तापकीर अन् विश्वजीत पवार यांनी आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत फडकवला भारताचा तिरंगा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मलेशिया येथे पार पडलेल्या मानाच्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धा २०२६ मध्ये पुण्यातील ‘ आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’ (RKL Galaxy International School) च्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे. शाळेचे होतकरू खेळाडू वेदार्थ तापकीर आणि विश्वजीत पवार यांनी उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर पदकांची लयलूट करत पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वेदार्थ तापकीर याने पोरुथल (काठीची लढत) प्रकारात रौप्य पदक, तर ओपन वेपन प्रकारात कांस्य पदक पटकावले. दुसरीकडे, विश्वजीत पवार यानेही प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत पोरुथल प्रकारात रौप्य पदक आणि काठी फिरवणे प्रकारात कांस्य पदक मिळवून देशाच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वास, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर जागतिक मंचावर छाप पाडली.
या भारतीय संघासोबत सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय सिलंबम एक्सपर्ट संजय बनसोडे आणि आंतरराष्ट्रीय रेफरी स्मिता धीवर यांनी अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
हेही वाचा
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आमच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे भारतीय पारंपरिक युद्धकला ‘सिलंबम’चा गौरव जागतिक पातळीवर अधिक उंचावला आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही यातून नवी प्रेरणा मिळेल.
– डॉ . पुष्कर चौबे (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – CEO)
वेदार्थ आणि विश्वजीत यांनी दाखवलेली शिस्त आणि घेतलेले कठोर परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन!
– मिस मित्तल शहा (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर – COO)





