Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कायद्याच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या विधि विभागात काम करण्याची संधी ; मंत्रालयात सहा आठवडे कामाचा अनुभव

मुंबई : कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधेयके, अध्यादेश, नियम आणि अधिसूचनांच्या मसुदा निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळणार आहे. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागात हा कामाचा अनुभव घेता येणार आहे.यासाठी १२ विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाते. कार्यानुभवाचा कालावधी २४ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर, २०२६ या सहा आठवड्यांचा असेल. हा कार्यानुभव यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतनही देण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विधेयके आणि अध्यादेशांचे मसुदे तयार करण्याची प्रक्रिया, कायद्यांअंतर्गत नियम व अधिसूचनांचे प्रारूप तयार करणे, तसेच राज्य विधिमंडळात विधेयके मंजूर होण्याची प्रक्रिया समजून घेता येणार आहे. याशिवाय विधि व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, संविधानातील कायदेशीर तरतुदींचा प्रत्यक्ष वापर आणि विधि विधान शाखेतील अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत सहावेळा या प्रकारची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षातील, तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षातील तसेच एलएलएमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीच या उपक्रमासाठी पात्र असतील.

हेही वाचा –  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमातून सहा, तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमातून चार आणि एलएलएममधून दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. एमएचटी सीईटी विधी किंवा सीएलएटीमध्ये किमान ७० गुण असणे आवश्यक आहे. समान गुण असल्यास बारावीच्या गुणांचा विचार केला जाईल. विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे तसेच महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. एका महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून केवळ एका विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांना एआयसीटीई इंटर्नशीप पोर्टलवरून ७ ऑगस्ट २०२६पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. प्रवेश परीक्षांची गुणपत्रिका, बारावी किंवा पदवीचे गुणपत्रक, शेवटच्या उत्तीर्ण परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचा रहिवासी दाखला अपलोड करावा लागेल. ई-मेल, पोस्ट किंवा प्रत्यक्ष सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मंत्रालयातील विधि व न्याय विभागाच्या विधि विधान शाखेत ही इंटर्नशिप होणार असून, विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहावे लागेल. इंटर्नशिपदरम्यान केलेल्या कामाची नोंद ठेवणे, गोपनीयतेबाबत हमी देणे आणि अखेरीस कार्यअहवाल सादर करणे आवश्यक असेल. यशस्वीरीत्या उपक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button