अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी ६ व्या ‘स्माईल सायक्लोथॉन’चे आयोजन
‘थिंक हेल्थ, नॉट ड्रग’चा संदेश; व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन

पिंपरी- चिंचवड | आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, स्माईल डी-अॅडिक्शन सेंटर आणि गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘६ वी स्माईल सायक्लोथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २७ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, चिंचवडगाव येथून सायक्लोथॉनला प्रारंभ होणार असून उर्से येथील स्माईल डी-अॅडिक्शन सेंटर येथे तिचा समारोप होईल. ‘पेडल फॉर अ कॉज’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून अंमली पदार्थमुक्त आणि आरोग्यसंपन्न समाजाचा संदेश देण्यात येणार आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडच्या प्रलंबित महसूल व वनविभागीय प्रश्नांवर महसूल मंत्र्यांची बैठक!
अंमली पदार्थांचे वाढते सेवन ही आजच्या समाजासमोरील गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने त्याविरोधात व्यापक जनजागृतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमधून ‘आरोग्याची निवड करा, अंमली पदार्थांना नकार द्या’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन…
या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना नवजीवन देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. “प्रत्येक पेडल हे व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनी या जनजागृती मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडविण्याच्या अभियानाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहभागासाठी संपर्क :
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी किंवा अधिक माहितीसाठी ९५७९६०८४५२ अथवा ८८०५६५६१९७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





