प्रतीक्षा यादीतील ३३० लाभार्थ्यांना लॉटरीत सदनिका जाहीर; १८ जूनपर्यंत स्वीकारण्याची मुदत!

प्रतीक्षा यादीतील ३३० लाभार्थ्यांना लॉटरीत सदनिका जाहीर; १८ जूनपर्यंत स्वीकारण्याची मुदत!

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ गृहयोजनेतील प्रतीक्षा यादीतील ३३० लाभार्थ्यांना अखेर सदनिका जाहीर करण्यात आल्या आहेत. मूळ सोडतीमधील लाभार्थ्यांनी सदनिका रद्द केल्यामुळे किंवा मुदतीत न स्वीकारल्यामुळे प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे.

‘पीएमआरडीए’कडून पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील एकूण १,०२९ सदनिकांसाठी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सोडत काढण्यात आली होती. या लॉटरी प्रक्रियेमध्ये एकूण ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते, तर ३,८४१ अर्जदार अयशस्वी ठरले होते. तसेच, ६५५ लाभार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आला होता. पात्र ठरलेल्या ८७१ लाभार्थ्यांना त्यांची सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा समर्पित (सरेंडर) करण्यासाठी दि. ११ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

हेही वाचा

महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

‘पीएमआरडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सोडतीतील ८७१ विजयी लाभार्थ्यांपैकी ४०१ लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारली आहे. उर्वरित ४७० लाभार्थ्यांनी तात्पुरते देकारपत्र निर्गमित होण्यापूर्वीच सदनिका रद्द केली, तर काहींनी मुदतीत पर्याय निवडला नाही. त्यामुळे सदनिका रिक्त राहिल्याने ‘पीएमआरडीए’ने दि. ८ जून २०२६ रोजी प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली. एकूण ६५५ प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांपैकी ३३० लाभार्थ्यांची नावे प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादीतून अंतिम मंजुरीनंतर विजयी म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व कमी उत्पन्न गट (एलआयजी) मधील विविध प्रवर्गांचा (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व नवबौद्ध, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व दिव्यांग) समावेश आहे.

प्रतीक्षा यादीतून विजयी घोषित झालेल्या या ३३० लाभार्थ्यांना सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा सोडून देण्यासाठी (सरेंडर) दि. ९ जून २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे पर्याय (‘एक्सेप्ट’ अथवा ‘सरेंडर’) उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी केले आहे. तसेच, सदनिका स्वीकारल्यानंतर ४५ दिवसांत २५ टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. गृहकर्ज घ्यायचे असल्यास १० टक्के रक्कम भरून नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल. उर्वरित रक्कम भरण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *