हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअरची नवी संधी!
शिक्षण विश्व: आयआयबीएम कॉलेजमध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम डिग्री अभ्यासक्रमाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड | एअरलाईन व पर्यटन उद्योगामध्ये वाढत असलेल्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन चिखली येथील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डिग्री अभ्यासक्रमाचे सोमवारी (दि. ८ जून) दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेला हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित एअरलाईन्स, ट्रॅव्हल व टुरिझम क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच डॉ. वर्णेकर यांनी शिक्षकांना एअरलाईन उद्योगातील वाढ, कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ सन्मान
प्राचार्य, विभागप्रमुख आणि शिक्षकांनीही या अभ्यासक्रमाद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला. या नवीन अभ्यासक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा मिळणार असून, एअरलाईन आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमास प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी, संदीप जाधव, प्रा. राहुल सर, मिलिंद उशिर, संतोष घाडगे, सिद्धार्थ गायकवाड, अनिकेत बिचुकले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम विशेष उपयुक्त…
या अभ्यासक्रमाची शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी विभागप्रमुख कु. प्रतिक्षा डफळ आणि त्यांच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या टीमकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी बोलताना कु. प्रतिक्षा डफळ म्हणाल्या, “या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतील. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व व्यावसायिक कौशल्ये देण्यासाठी आमची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे. आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी संवादकौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.”





