हकालपट्टी नव्हे, स्वाभिमानाने पक्षत्याग; विरोधकांकडून खोट्या अफवा !
मिशन- PCMC: चेतन बेंद्रे, समीर जावळकर यांचा स्पष्ट निर्वाळा

पिंपरी-चिंचवड : शहरातील राजकीय वर्तुळात आपल्याबाबत जाणीवपूर्वक पसरवण्यात येणाऱ्या अफवा व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा शिवसेनेचे उमेदवार चेतन गौतम बेंद्रे आणि समीर दिलीप जावळकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षातून आमची हकालपट्टी झालेली नसून, स्वाभिमानाने आणि विचारधारेशी प्रामाणिक राहून आम्ही ३० डिसेंबर रोजीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मा. खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ३० डिसेंबर रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला होता. कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, केवळ जनसेवा व विकासाच्या ध्येयाने हा निर्णय घेतल्याचे दोन्ही उमेदवारांनी सांगितले.
हेही वाचा – वाकड गावठाणातून विजयाचा संकल्प : भाजपा पॅनलची भव्य पदयात्रा!

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली – चेतन बेंद्रे
यासंदर्भात बोलताना चेतन बेंद्रे म्हणाले, “आमच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा म्हणजे विरोधकांच्या पराभवाची चाहूल आहे. जनतेचा वाढता विश्वास पाहून विरोधक बिथरले आहेत. शहरात अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केले असताना ‘हकालपट्टी’सारखी भाषा वापरण्यात आली नाही. मात्र, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांबाबत अशी खोटी माहिती पसरवली जात आहे, यातच विरोधकांची भीती आणि आमचे यश दडले आहे.”
विकास व जनतेच्या विश्वासावर ठाम – समीर जावळकर
समीर जावळकर यांनी सांगितले, “आम्ही शिवसेनेच्या विचारधारेशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. विरोधक कितीही अफवा पसरवत असले, तरी जनतेचा आमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नकारात्मक राजकारण न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत.” दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता प्रत्यक्ष काम, पारदर्शकता आणि स्वच्छ चारित्र्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.




