विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित भारावले!
शिक्षण विश्व: मोशीतील प्रियदर्शनी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड: मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे शैक्षणिक वर्षासाठीचे वार्षिक स्नेहसंमेलन लांडगे सभागृह, भोसरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित भारावले.
“भारत से इंडिया, इंडिया से भारत” ही या स्नेहसंमेलनाची मुख्य संकल्पना होती. या संकल्पनेतून भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा ते आधुनिक आणि प्रगत राष्ट्र असा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार नृत्य, नाट्य, गीत व समूह सादरीकरणांतून भारतीय परंपरा, संस्कृती, मूल्ये, एकता आणि विकास यांचे सुंदर दर्शन घडले. कार्यक्रमातून देशभक्ती, विविधतेतील एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना ठळकपणे प्रतिबिंबित झाली.
हेही वाचा – निर्यातीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अंतरमंत्रालय गट’ स्थापन
या स्नेहसंमेलनास उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता, शिस्त आणि सादरीकरण कौशल्याचे मनापासून कौतुक केले. मान्यवर पाहुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षणतज्ज्ञ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
शाळेच्या नेतृत्वाने आपल्या मनोगतातून शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार, संस्कृती आणि मूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळा सातत्याने भर देत असल्याचे नमूद केले.
एकूणच हे वार्षिक स्नेहसंमेलन भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करणारे आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारे संस्मरणीय उत्सव ठरले. प्रियदर्शनी स्कूल विविधतेत एकता जपणारे, संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्यास कटिबद्ध असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.





