भोसरी येथे राष्ट्रीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिक्षण विश्व: मास्टर माइंड ग्लोबल स्कूल तर्फे आयोजन

पिंपरी चिंचवड | भोसरी येथील मास्टर माइंड ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. गुजरात सुरत दहाणू मुंबई पनवेल सातारा सांगली मिरज सोलापूर लातूर आणि पुणे अशा विविध राज्य व शहरांमधून सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या गणिती कौशल्याची प्रभावी झलक दाखवली.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी अंकलॉजिस्ट करण चंचलानी , आपला आवाज आपली सखी संस्थेच्या संचालिका संगीता तरडे, क्रिएटिव्ह कॅलिबर माईंडच्या संचालिका कांचन मुछाल आणि विद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रदीपा नायर यांच्या हस्ते संपन्न झाले. अतिथींनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या वेगवान आणि अचूक गणनक्षमतेचे कौतुक करत अशा स्पर्धा मुलांच्या बौद्धिक विकासाला अत्यंत पूरक असल्याचे मत व्यक्त केले.
हेही वाचा : फलटणच्या मृत महिला डॉक्टरच्या हातावरचं अक्षर तिचंच; मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती..
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी काही सेकंदांत गुंतागुंतीची उदाहरणे सोडवून परीक्षकांना प्रभावित केले. विविध गटांसाठी स्वतंत्र प्रश्नसंच तयार करून विद्यार्थ्यांच्या वेग अचूकता आणि मानसिक गणनेची क्षमता तपासण्यात आली.
समारोप प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे आणि ट्रॉफीद्वारे गौरव करण्यात आला. शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमाच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक पालक आणि मान्यवरांचे आभार मानले.




