मिशन PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे+काँग्रेस ‘‘आघाडी’’ सर्व जागा लढवणार!
शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचे सूतोवाच : पहिल्या टप्प्यातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । शहरात दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याच्या हालचालींनी रंग चढत असतानाच, आता शिवसेना उद्धव ठाकरे गट- मनसे आणि काँग्रेसने महापालिकेच्या सर्व जागांवर एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा+ मनसे+ काँग्रेस अशी ‘‘आघाडी’’ भाजपा आणि राष्ट्रवादीशी दोनहात करणार आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी याबाबत सूतोवाच केले. त्यांच्याकडे मावळ लोकसभा आणि पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी आहे. शहरातील 32 प्रभागांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. वाघेरे म्हणाले की, “पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, आघाडीच्या माध्यमातून सर्वच १२८ प्रभागांवर आमची लढत होणार आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेससोबत समन्वय बैठका सुरू आहेत आणि ‘महाविकास आघाडी’ (ठाकरे गट + मनसे + काँग्रेस + इतर पुरोगामी संघटना) म्हणून प्रत्येक प्रभागात भाजपाविरुद्ध मजबूत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने महाविकास आघाडीत एकत्रित निवडणूक लढवली. किंबहुना, विधानसभा निवडणुकीत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिनही मतदार संघांमध्ये ‘‘तुतारी’’च्या चिन्हावर उमेदवार देण्यात आले होते. त्याच वेळी निष्ठावंत शिवसैनिकांनी एकप्रकारे उठाव केला होता.
आता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांकडून दोन्ही ठाकरेंसोबत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत मतभिन्नता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीला सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत लढल्यास शिवसेना ठाकरे गट एकाकी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आणि काँग्रेस अशी ‘‘आघाडी’’ करण्याबाबत प्रदेश पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट+ मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली. आम्ही शहरातील सर्व 128 जागांवर उमेदवार देणार आहोत. त्याअनुशंगाने आम्ही मुलाखती सुरू केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग आहे. मनसे आणि काँग्रेस एकत्रित ताकद झाली, तर निश्चितपणे भाजपासमोर तगडे आव्हान उभे राहील.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, शिवसेना उबाठा, पिंपरी-चिंचवड.





