‘लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, उपकार विसरणार नाही!’ तरुणाचे थेट शरद पवारांना पत्र

Sharad Pawar | राज्यात वाढत्या अविवाहित तरुणांच्या प्रश्नाचा गंभीर मुद्दा समोर येत असताना अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अनोखी मागणी केली आहे. शरद पवार यांच्या अकोला दौऱ्यात या तरुणाने दिलेल्या पत्राची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.
शनिवारी शरद पवार शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी अकोल्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर त्यांनी नागरिकांकडून विविध निवेदने स्वीकारली. याचदरम्यान एका तरुणाचे पत्र त्यांच्या हातात पडताच सर्वांचे लक्ष वेधले.
हेही वाचा : लंडनमधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

पत्रात नेमकं काय?
या लग्नाळू तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही.” तरुणाचे हे पत्र आज समाज माध्यमावर प्रचंड प्रसारित झाले.





