लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना E-KYC करणं बंधनकारक, कुठे आणि कशी करणार प्रक्रिया?

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ई-केवायसी (E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे. लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. मात्र, काही अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्याने सरकारने ई-केवायसीद्वारे पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.
हेही वाचा : ओला, उबरची भाडेवाढ, प्रवास ‘इतके’ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री
ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया सीएससी केंद्रांवर किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येईल. जर लाभार्थ्यांनी मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांचा मासिक लाभ थांबवला जाऊ शकतो.
सरकारने स्पष्ट केले आहे की, दरवर्षी जून महिन्यात दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी करणे बंधनकारक राहील. यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल. सर्व लाभार्थी महिलांना आवाहन आहे की, वेळेत ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ सुरळीतपणे घ्यावा.
ई-केवायसी प्रोसेस कशी करायची?
तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करायची आहे. यासाठी काही कागदपत्रे, महत्त्वाची माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल. यासाठी वेबसाइटवर प्रोसेस सुरु झाली आहे.
तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन केवायसी करु शकतात.
केवायसीमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि माहिती टाकायची आहे.
तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड माहिती टाकायची आहे.
त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.
सध्या तरी वेबसाइटवर प्रोसेस सुरु झालेली दिसत नाहीये. मात्र, लवकरच ही प्रोसेस सुरु होईल आणि केवायसी कशी करायची याबाबत माहिती दिली जाईल.




