शिक्षण विश्व: आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २३ शिक्षकांचा सन्मान

पिंपरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने विविध शाळांतील २३ आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, प्रशासन अधिकारी तृप्ती सांडभोर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शाळा म्हणजे भविष्यासाठीचा पाया” – आमदार अमित गोरखे
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले, “शिक्षक समाजाच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. माझी जडणघडण महापालिका शाळेतच झाली असून त्यामागे माझ्या शिक्षकांचे अमूल्य योगदान आहे.” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, “शाळा म्हणजे मुलांच्या भविष्यासाठीचा भक्कम पाया असून, तो पाया मजबूत करण्याचे कार्य आपले शिक्षक समर्पणाने करत आहेत.”
आयुक्तांचा व्हिडिओ संदेश…
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले, “शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदाते नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे शिल्पकार आहेत. आपल्या शाळा ही शिक्षणाचे केंद्र न राहता भावी पिढी घडविण्याचे मंदिर व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे.”
सन्मानित शिक्षकांची यादी
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी शाळांतील शिक्षकांचा समावेश करण्यात आला. क्रीडा शिक्षक भाऊसाहेब व्यंकट खैरे, जाधववाडीच्या जितेंद्र कराड आणि आबासाहेब पाळवंदे यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.
बालवाडी विभाग:
सविता मांडेकर (थेरगाव)
नसरीन बानो मोहम्मद सुलतान (उर्दू शाळा, थेरगाव)
वैशाली साकोरे (मोशी)
प्राथमिक विभाग:
प्रियंका गावडे, सुभांगी भोंडवे (मोशी, पीसीएमसी)
प्रदीप घुटे (दिघी)
स्वाती शिंदे (भोसरी)
कांचन घोडे (मोशी)
विश्वलता मोरे (चिखली)
मारुती खामकर (कुदळवाडी)
चित्रा शेवकरी (पिंपळे गुरव)
उस्ताद बिबिहाज्रा जंगबहादूर (थेरगाव उर्दू)
माध्यमिक विभाग:
प्रिया नांगरे (पिंपळे गुरव)
वैशाली मामुल्वार, राजश्री कांबळे, क्षितिज शिंदे (पिंपळे सौदागर)
खासगी शाळा:
मनिषा कदम (विलू पूनावाला शाळा, निगडी)
अंजू सोनावणे (फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड)
इतर विशेष पुरस्कार:
सखाराम पितळे (जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्कूल व ज्युनियर कॉलेज)
मेघा कानडे (कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळा, काळेवाडी)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले. सूत्रसंचालन चारोशीला फुगे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश लिंगडे यांनी केले.





