पिंपरी महापालिकेकडून दोन दिवसांत चार हजारांवर मूर्तींचे संकलन!
पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ४ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती ८२२ तर पीओपीच्या ३ हजार २१० मूर्तींचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद ठेवताना ती पीओपीची आहे की शाडू मातीची आहे, याप्रमाणे नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज संकलित होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
हेही वाचा : ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रभागनिहाय मूर्ती संकलन
* अ प्रभाग – १४
* ब प्रभाग – ६२५
* क प्रभाग – ८७४
* ड प्रभाग – ८८०
* ई प्रभाग – ३३४
* फ प्रभाग – २२७
* ग प्रभाग – ७१४
* ह प्रभाग – ३६४
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्ती संकलन उपक्रमामध्ये नागरिकांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाचे यश आहे. या संकलन मोहिमेमुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल.
* शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर दोन दिवसांत चार हजारांपेक्षा जास्त मूर्ती संकलित झाल्या असून सर्व मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाईल. नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड घडविण्यास हातभार लावावा.
* संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका




