ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बिग बजेट ‘घबाडकुंड’ची जोरदार चर्चा

भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक अन् नेत्रदीपक सेट..

मुंबई : जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली, कष्ट उपसले, खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं घबाड मिळावं आणि चुटकीसरशी श्रीमंत होता यावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक धनप्राप्ती होणे, एखादी लॅाटरी लागणे, नशीबच पालटणे असा घबाडचा अर्थ आहे. ‘कुंड’ म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हींचे मिळून ‘घबाडकुंड’ असे सिनेमाचे लक्षवेधी शीर्षक ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक, नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे. मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अ‍ॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. ‘घबाडकुंड’ या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत.

दिग्दर्शक प्रीतम पाटील ‘घबाडकुंड’च्या रूपात आणखी एक उत्कंठावर्धक कथानक असलेला बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर इथं सिनेमाचा सेट उभारला आहे. 10 ते 12 हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारख्या कलाकारांची फौज आहे

हेही वाचा  :  जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!

मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला असून, विविध माध्यमांद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कलाकार या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे.

‘घबाडकुंड’ चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचं आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचं आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषा अभिषेक याची आहे. प्रोडक्शन मॅनेजर सिद्धार्थ आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा :महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button