एकनाथ पवारांच्या वेगवान राजकीय हालचाली; पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये खलबते
ज्येष्ठ नेत्यांसोबत सलग भेटीगाठी; शहर कार्यकारिणी जाहीर होण्याकडे लक्ष

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे माजी सत्तारूढ पक्षनेते व भाजप युवा नेते एकनाथ पवार यांनी अलीकडच्या काळात राजकीय हालचालींना वेग दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तडकाफडकी राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये पुनर्प्रवेश केला होता. त्या वेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्धावर जात नव्हते’; संजय राऊतांचं वक्तव्य
तथापि, अद्याप मानाचे पद न मिळाल्याने पवार यांनी आता थेट केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी डावपेच सुरू केले आहेत. गेल्या भोसरी विधानसभा निवडणुकीत पवार यांनी आमदार महेश लांडगे यांना कडवी टक्कर दिली होती.
दरम्यान, भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नियुक्ती होऊन तीन महिने उलटूनही शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटातटाच्या चर्चेला उधाण आले असून, जुन्या व आजी-माजी पदाधिकारी गुप्त खलबते करत असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या काही दिवसांत पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.





