अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ साजरा
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश

पिंपरी चिंचवड: अभिषेक इंटरनॅशनल स्कूल, मोशी येथे ग्रीन डे उत्साहात, साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे व निसर्गप्रेमाची भावना वाढवणे हा होता.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने निसर्गाचे सौंदर्य विविध चित्रांतून दाखवले. झाडे, फुले, पर्वत, नद्या यांसारख्या दृश्यांनी भरलेली ही चित्रे पर्यावरणाच्या सौंदर्याची साक्ष देत होती. या निमित्ताने घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. ६ ते १० विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन व हरित जीवनशैली या विषयावर घोषवाक्ये तयार केली. ही प्रेरणादायी घोषवाक्ये शाळेच्या भिंतींवर लावण्यात आली, ज्यामुळे पर्यावरणाविषयी जागरूकतेचा प्रसार झाला.विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानव झाडाची रचना केली. या उपक्रमाद्वारे एकतेचा संदेश व निसर्गाशी आपले नाते अधोरेखित करण्यात आले. हा अनोखा प्रयोग सर्वांनी आनंदाने अनुभवला.
हेही वाचा – देशात ’अॅग्रिस्टॅक’अंतर्गत शेतकरी नोंदणीत महाराष्ट्र अग्रस्थानी
सर्व शिक्षक व विद्यार्थी हिरव्या रंगाच्या पोशाखात शाळेत दाखल झाले. हिरवा रंग ही निसर्गाची ओळख असल्याने संपूर्ण वातावरणात ताजेपणा आणि सजीवता निर्माण झाली. या निमित्ताने साजऱ्या झालेला ग्रीन डे विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उपक्रम नव्हता, तर भविष्यासाठी सकारात्मक आणि शाश्वत विचारांची बीजे पेरणारा अनुभव ठरला.





