मोठी बातमी! वकील उज्ज्वल निकम यांच्यासह ‘या’ तिघांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

Ujjwal Nikam : प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘स्वत:ला लादून कोणी महान होऊ शकत नाही’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी
दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून उज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. या संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींनी चार जणांच्या नावाचं नामांकन केलं आहे. कारण या पूर्वी नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर आता हर्षवर्धन श्रृंगला, सी सदानंदन मास्ते, मीनाक्षी जैन आणि उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




