ताज्या घडामोडीपुणे

“नाटकाचा तास” – प्रा. देवदत्त पाठक यांचे नवे पुस्तक गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशित

शाळांमध्ये "नाटकाचा तास" नियमितपणे घ्यावा – प्रा. पाठक यांचा सल्ला

पुणे : बालवयातील व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटक हे केवळ एक माध्यम नसून, एक प्रभावी शैक्षणिक साधन आहे, हे सिद्ध करणारे प्रा. देवदत्त पाठक यांचे “नाटकाचा तास” हे नवे पुस्तक गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने प्रकाशित झाले. हे पुस्तक देवदत्त प्रकाशनचे विसावे प्रकाशन असून, शिक्षण व रंगभूमी यांचा सुंदर मिलाफ यातून साधण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलाशिक्षणाला दिलेले महत्त्व ध्यानात घेता, या पुस्तकात रंगभूमी कला ही केवळ अभिनय न राहता, बालकांच्या बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक विकासासाठी कशी उपयुक्त ठरते, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्रा. देवदत्त पाठक हे गेली ४० वर्षे नाट्यमाध्यमातून मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व सुधारणा, वर्तन दुरुस्ती आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.
“नाटकाचा तास” या पुस्तकात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेले ४० रंगमंचीय खेळ समाविष्ट आहेत.

शिक्षकांसाठी यामध्ये प्रत्येक खेळाचे सोप्या भाषेत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले आहे. केवळ “ऑफ पीरियड” भरून काढण्यासाठी नव्हे, तर शाळेच्या वेळापत्रकात “नाटकाचा तास” हे स्थायिक करणे गरजेचे आहे, असा ठाम विश्वास प्रा. पाठक यांनी व्यक्त केला.

रंगभूमी: संवाद, अभिव्यक्ती आणि अंतर्मनाचा प्रवास
प्रा. पाठक यांच्या मते, नाटक ही सजीव, साद–प्रत्युत्तरात्मक कला असून ती शब्द, हालचाल, देहबोली आणि संवेदना यांच्या माध्यमातून मुलांच्या अंतरंगात झिरपत जाते. नाटकाच्या तासामुळे मुलांचे वागणं, चालणं, बोलणं, बघणं अशा व्यक्तिमत्त्वविषयक अनेक पैलूंमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो.

हेही वाचा – “पिकलेल्या दाढीचे केस रंगवण्याची वेळ…”; विराटने सांगितले कसोटी निवृत्तीचे कारण

प्रसिद्ध व्यक्तींनी आणि संस्थांनी मान्यता दिलेला उपक्रम
आजवर या उपक्रमाचे महत्त्व स्व. बाबा आमटे, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, दीपा लागू, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, उपेंद्र लिमये, अंजली बापट, सोनाली कुलकर्णी, मंगेश तेंडुलकर यांसारख्या दिग्गज कलाकार व समाजसेवकांनी मान्य केले आहे.

युनिसेफ, प्लॅन इंटरनॅशनल, अखिल भारतीय नाट्य परिषद, स्वाधार यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनीही या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

स्पर्धात्मक युगात स्थिरतेचा शोध – नाटकाचा तास
आजच्या धावपळीच्या युगात मुलांचं मन, शरीर आणि विचार स्थिर करणं हे मोठं आव्हान आहे. “नाटकाचा तास” मुलांना योग्य विचार आणि कृतीसाठी प्रेरित करतो, त्यांना सर्जनशील, संवेदनशील आणि कृतीशील नागरिक बनवतो, असा विश्वास प्रा. पाठक आणि सहप्रकाशक मिलिंद केळकर यांनी व्यक्त केला.

पुस्तकाची माहिती:
पुस्तकाचे नाव: नाटकाचा तास

लेखक: प्रा. देवदत्त पाठक

प्रकाशक: देवदत्त प्रकाशन

प्रकाशन क्रमांक: २०वे

विषय: रंगमंचीय खेळांद्वारे बाल व्यक्तिमत्त्व विकास

लक्ष्यवर्ग: इयत्ता १ ली ते ४ थी, तसेच शिक्षक व शाळा

“नाटकाचा तास” हे पुस्तक केवळ शिक्षणाच्या चौकटीत बसत नाही, तर ती चौकट विस्तारून शिक्षणात मानवी स्पर्श निर्माण करतं. अशा साहित्याची आजच्या शिक्षणप्रणालीला नितांत गरज आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button