मुंबई : राज्यात अघोरी वरुन राजकारण पेटले आहे. मंत्री भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला होता, ज्याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही नवा व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली. दरम्यान, या होणाऱ्या गंभीर आरोपांवर गोगावले यांनी थेट उत्तर दिलं आहे. आघोरी करुन पालकमंत्री व्हायचे असते तर कधीच झालो असतो. आम्ही अघोरी, बिगारी जाणत नाही. असे गोगावले म्हणालेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेंच सुरु आहे.
अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गोगावले यांचा एक व्हिडीओ शेअर करत बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असं कॅप्शन देत राजकारणाच्या वर्तुळात खळबळ उडवून दिली. पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय. त्याआधी ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी गोगावले हे अघोरी पूजा करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाकडूनही भारत गोगावले यांना लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःच्या घरात होम हवन करत अघोरी पूजा घातली होती. यासाठी त्यांनी उज्जैन येथील बगलामुखी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांना बोलावले होते. या पुजाऱ्यामार्फत त्यांनी घरात अघोरी पूजा घातली होती असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केला.
हेही वाचा – महाबळेश्वर-तापोळा रस्ता पावसाने खचला; वाहतूक पूर्णपणे ठप्प
मात्र भरत गोगावले यांनी अघोरी पूजेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.’मी कोणतीही अघोरी पूजा केलेली नाही. माझ्या घरी अनेक साधू आणि संत येतात, हा व्हिडिओ त्याचाच आहे. तो चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,’ असं गोगावले यांनी म्हटलं. तसेच, अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही. साधू-महात्मे भेटायला येतात. त्यांना आम्ही भेटतो. अघोरी करायचे असते तर कधीच पालकमंत्री झालो असतो. राष्ट्रवादीकडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत.
यासोबतच, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही चव्हाण यांना सुनावलंय. तटकरेंवर घणघाती आरोप करत अघोरी विद्या तटकरेंची संस्कृती आहे. चव्हाण हे पाळलेले प्रवक्ते आहेत. ते काही मनाला येईत ते बोलतात. त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असं दळवी म्हणालेत.




