Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

काळजी घ्या!! पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ

पुणे : पुण्यात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने लोकांची चिंता वाढली आहे. या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकूण ५९ लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. यापैकी १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजारचे किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिसरातील पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांच मत आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांनी जीबीएसची प्रकरणी पुणे महापालिकेकडे अहवाल दिला. ज्या भागामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे पुलकुंडवार यांनी सांगितले.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५९ रुग्णांपैकी ३३ रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील, ११ महापालिका हद्दीतील आणि १२ पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत. तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. हा आजार कोणालाही होऊ शकतो. विशेषत: १२ ते ३० वयोगटांतील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हा आजार धोकादायक नसल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा –  ‘बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल’; संजय राऊत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या आजाराबाबत शरद पवार यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापूर्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे, असंही शरद पवार म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लक्षणे कोणती?

गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. ही लक्षणे काही दिवसाने वाढू लागतात. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं दिसून आली आहेत. हातापायाची ताकद कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे याशिवाय गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. सर्वांत गंभीर प्रकरणांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे संपूर्ण पक्षाघात होऊ शकतो.

हा आजार १ लाख लोकसंख्येमागे एकाला होतो. हा आजार अत्यंत दुर्मिळ आजार असून रुग्णाच्या मज्जातंतूवर आघात करतो. काही दिवसांपूर्वी एका ६५ वर्षीय महिलेला गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार झाला होता. या महिलेने तात्काळ रुग्णालय गाठत यावर उपचार केल्याने ती महिला यातून बरी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो. वेदनाही होतात. चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. या आजारात कधी कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला, तरी रुग्ण लवकर बरेही होतात. मात्र, बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button