पुण्यातील गुन्हेगारी घटनांवरून अजित पवार पुणे पोलिसांवर संतापले

Ajit Pawar : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. शहरातील गॅंग वॉर, कोयता गॅंग, महिलांवरील हल्ल्यांची घटनांमुळे सुसंकृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. अशातच मंगळवारी शहरातील येरवडा परिसरामध्ये एका तरुणीची हत्या झाल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर परखड भाष्य करताना, वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडत असल्याचे म्हंटले आहे.
पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य केले. ते म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे जे काही प्रश्न निर्माण होतात, त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडत आहेत असं वाटतं. जर त्यांना हे जमत नसेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं की हे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जर असं असेल, तर इतर चांगले अधिकारी आणून, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम आणि योग्य पद्धतीने कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम आम्ही करू.
“आपल्या आयटीमध्ये काम करणाऱ्या मुली किंवा इतर भगिनी वर्ग यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे. कोयता गँग, टोळ्या यांच्याबद्दल महाराष्ट्रात सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. हे सगळं पाहता, मी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार आहे.”
हेही वाचा – दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“राजकीय हस्तक्षेप नसल्यास पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही. इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. पोलिसांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा आहे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाहनं, घर बांधणीचे कार्यक्रम, कार्यालयं यांसारख्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. उदाहरणार्थ, सीपी कार्यालय, पिंपरी-चिंचवड कार्यालय, एसपी कार्यालय, ग्रामीण भागातील कार्यालयं—ही सगळी कामं आम्ही हाती घेतलेली आहेत.
“राज्य सरकार जर एवढ्या सगळ्या गोष्टी करत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे जे काही प्रश्न निर्माण होतात, त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडत आहेत असं वाटतं.” असे परखड मत देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.




